घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास आणि स्थापत्य
घृष्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे स्थित असलेल्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भगवान शंकराला समर्पित असून, हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. भारतातील हे एकमेव ज्योतिर्लिंग मंदिर आहे जिथे भगवान शंकराचा संपूर्ण परिवार एका मूर्तीत आहे म्हणजेच भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय नंदीवर विराजमान आहेत आणि भगवान शंकराने जटेत गंगा धारण केलेली आहे. ही नक्षीकात्मक मूर्ती मंदिराच्या शिखरावर शीर्षभागी पांढऱ्या दगडात कोरलेली असून, मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारातून ती स्पष्टपणे दिसते.
मंदिराच्या एका स्तंभावर हत्ती आणि नंदी ची कोरीव नक्षीकात्मक मूर्ती आहे. हे नक्षीकाम हरी-हर भेटीचे (भगवान विष्णू व शंकर यांची भेट) प्रतीक म्हणून मानले जाते. तसेच मंदिराच्या २४ खांबांवरती यक्षाच्या आडव्या मूर्ती आहेत; ज्या हे दर्शवतात कि यक्षांनी पूर्ण मंदिराचा भार स्वतःच्या खांद्यावर व पाठीवर पेलला आहे. .
हे मंदिर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते आणि सन १८०० मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी त्याचे पुनर्निर्माण केले. हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून वेरूळ (एलोरा) लेण्यांपासून केवळ १.५ कि.मी. अंतरावर आहे आणि संभाजीनगर शहरापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी बांधले गेले असून, ४४,००० चौ.फु. क्षेत्रफळात विस्तारले आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर देवी-देवतांची सुंदर कोरीव मूर्तिशिल्पे आहेत. मंदिराच्या आत गर्भगृह असून, येथे १७ फूट लांब आणि १७ फूट रुंद शिवलिंग आहे. सर्व भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याची परवानगी आहे.